येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी पथकाने करमाळा तालुक्यातील वीट येथील एका महिलेच्या खुनाचा गुन्हा अवघ्या 48 तासात उघडकीस आणला आहे. पोलीस स्टेशन आणि एलसीबी यांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात संबंधित महिलेचा खून तिचे अनैतिक संबंध असणाऱ्या एका व्यक्तीने हाताच्या आकाराएवढ्या छोट्याशा दगडाने ठेचून केल्याचे उघड झाले आहे, ही व्यक्ती आठ दिवस खिशात दगड घेऊन संधीची वाट पाहत होती ,असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले .
संबंधित मयत महीलेचे अनेकांशी संबंध होते. या महिलेने आरोपीकडे तीन ते चार हजार रुपयांची मागणी केली होती .आरोपी धनाजी प्रभाकर गाडे आणि मयत स्त्री दोघेही 27 वर्षांचे असून दोघांचे आडनाव एक असले तरी दोघांचे नातेसंबंध नसल्याचेही सातपुते यांनी स्पष्ट केले .मयत महिलेच्या अंगावर वरील कपडे विस्कटलेले असल्यामुळे संबंधित महिलेवर अत्याचार झाले आहेत का ?याबाबत तपास चालू आहे. प्रयोगशाळेतून तीन ते चार दिवसात अहवाल आल्यानंतर आरोपी विरुद्ध कलम 376 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो ,असेही सातपुते यांनी स्पष्ट केले. प्रथमच गुन्हा करणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या सततच्या तपासाला दाद न देता उडवाउडवीची उत्तरे दिली होती . परंतु एलसीबी आणि पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हार न मानता संबंधित आरोपीस दुसरा विचार करण्याची संधी दिली नाही व त्याच्याकडून गुन्हा केल्याचे वदवून घेतल्याचेही सातपुते यांनी सांगितले. आरोपी आणि मयत महिलेची ओळख असल्यामुळे ही महिलाआरोपी बरोबर आडोशाच्या ठिकाणी गेली असावी त्यानंतर बेसावध असताना तिच्या डोक्यावर छोट्याशा दगडाने आरोपीने जोरदार हल्ला केला व या हल्ल्यात संबंधित महिला पहिल्या फटक्यात बेशुद्ध झाली असावी असेही त्यांनी सांगितले. आरोपीने या दगडाने अनेक वेळा ठेचून मयत महिलेचा मेंदू डोक्यातून बाहेर येईपर्यंत घाव घातल्याचे ही सातपुते यांनी स्पष्ट केले. मयत महिलेच्या मुलाने जेव्हा प्रथम आईचा मृतदेह पाहिला तेव्हा जोरात ओरडल्यानंतर शेतातून काहीजण पळत घटनास्थळी आले त्यामध्ये आरोपीचाही समावेश होता असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.