सोलापूर : माजी आमदार रमेश कदम आणि त्यांची कन्या सिद्धी कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माझ्या मुलीला लहान वयात संधी दिली, त्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष फार्म ठेवायचा नाही, हा विचार करून मी आणि माझ्या मुलीने विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केले.
“माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सिद्धी कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.
मोहोळमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे माजी आमदार रमेश कदम हे नाराज झाले होते. त्यानंतरही कदम यांनी दिपावली पाडव्याच्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.”
“दरम्यान, रमेश कदम यांनी रविवारी मोहोळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.”