पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची केली पाहणी!
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्न व समस्या सोडवून विद्यापीठ एक प्रशस्त होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच एक बैठक बोलवणार असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
सोमवारी, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. त्याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसमध्ये साकारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व स्मारकाची पाहणी केली. प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या 482 एकर परिसरातील फॉरेस्टच्या काही आरक्षित जागेमुळे निर्माण झालेल्या समस्येबद्दल माहिती त्यांना दिली. अल्प मनुष्यबळ असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी मान्यता देण्यासंदर्भात देखील त्यांना विनंती केली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, स्मारक समितीचे सदस्य माऊली हळणवर, प्रा. शिवाजी बंडगर, प्रा. सुभाष मस्के, सोमेश क्षीरसागर, अमोल कारंडे, बापू मेटकरी, शरणू हांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली. या संदर्भात आठवडाभरात संबंधित विभागाच्या मंत्र्यांची तसेच सचिवांची बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत देखील बैठक लावून विद्यापीठ प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.
स्मारक अनावरणासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्याची समिती सदस्यांनी केली विनंती!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसमध्ये साकारलेल्या अहिल्यादेवींच्या भव्य पुतळा व स्मारकाचे अनावरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची समितीच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यानुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिवशी म्हणजे दि. 31 मे 2025 रोजी वेळ घेण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी मागणी स्मारक समितीचे सदस्य प्रा. शिवाजी बंडगर यांनी केली. यावेळी निश्चितच आपण यासाठी पुढाकार घेऊ, असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर स्मारकाच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेऊन लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.



