सोलापूर,दि.4: वन विभाग सोलापूर यांच्यामार्फत 7 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह आयोजित केला असून सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते सिद्धेश्वर वन विहार येथे उद्घाटन झाले.
सप्ताहानिमित्त सोलापूर वन विभागामार्फत पर्यावरण व वन्यजीव संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वन विभाग सोलापूर व परिचारिका नर्सेस कर्मचारी सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले हाते.
कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर हा महाराष्ट्रामधील आगळावेगळा कार्यक्रम असून वनांची निरंतर सेवा करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी, असे श्री. नाईकडे यांनी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, सहा.वनसंरक्षक बी.जी.हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, वनपाल शंकर कुताटे, परिचारीका नर्सेस कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सुशिला गायकवाड आदी उपस्थित होते.
शिबीरात रघोजी किडनी ॲन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सोलापूरचे डॉ. संगमेश्र्वर पाटील व डॉ. गजानन पिलगुलवार यांनी आरोग्य तपासणी केली.