शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. नऊ दिवस देवांची पुजा त्या देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी वेगवेगळया पद्धती असतात. घटस्थापनेला घरी भट- सवाष्ण जेवायला बोलावतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून त पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस दीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात.
काही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. नवव्या दिवशी होम हवन होतो. ब्राह्मण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दस-याला आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे.
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
कशाप्रकारे करतात घटस्थापना
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात. ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. उपासना केली जाते. नवरात्रातील ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एक एक दिवसाने घटा खालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीचे घटावरच दर्शन असते.