सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. दोन आमदारांमध्ये फाईट चांगलीच गाजली आणि राम सातपुतेंना पराभव पत्करावा लागला. आता सहा महिन्याच्या आतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदार संघात पोटनिवडणूक होणार नाही. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे कट्टर दुश्मन माजी आमदार आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दिलीप माने, एम आय एम चे फारूक शाब्दी आदींनी लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना साथ दिली.
त्यामुळे आता सोलापूर शहर मध्ये ची जागा काँग्रेस आडम मास्तर यांना सोडणार का हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले महेश कोठे यांचे नाव नेहमीप्रमाणे सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य मतदारसंघात आहे. माजी नगरसेवक बाबा मिस्त्री , काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, यांची ही नावे विधानसभेसाठी शहर मध्ये मधून चर्चेत आहेत. या मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र कोठे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे खासदार झाल्यामुळे त्यांच्या आमदारकीची जागा मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा आत्तापासून लागल्याचे दिसते.