नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरातून आयकर विभागानं 353 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. साहू यांच्या घरी रोकड जप्त केली, त्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने पावले उचलली आहेत. काँग्रेस पक्षाने या रोकडीबाबत धीरज साहू यांना जाब विचारलाय. इतके पैसे आले कुठून? हे पैसे कुणाचे आहेत? इतके पैसे का ठेवले ? यासारख्या प्रश्नांची काँग्रेसने धीरस साहू यांच्यावर सरबती केली.
काँग्रेस खासदार असल्यामुळे या पैशांबाबत पक्षाने स्पष्टीकरण मागितलेय. सुत्राने सांगितले की, धीरज साहू यांनी काँग्रेस पक्षाच्या या प्रश्नावर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. काँग्रेस पक्षाचे धीरज साहू यांच्या स्पष्टीकरणाकडे लक्ष लागलेय.धीरज साहू यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरच काँग्रेस पुढील पावले उचलणार आहे.
धीरज साहू यांच्या झारखंड, ओढिशा आणि पश्चिम बंगाल येथील नऊ ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने छापेमारी केली. तेथे कपाटभरुन नोटा जप्त केल्या. 280 कर्मचाऱ्यांचे पथक आठवडाभर या नोटा मोजत होते. नोटा मोजणारी मशीनही बंद पडली होती. धीरज साहू यांच्याकडून तब्बल 253 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींपासून सर्वांनीच काँग्रेसवर निशाणा साधलाय. दोनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही साहू यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांच्या मौनावर भाजपने प्रश्न उपस्थित केला होता. आता काँग्रेस पक्षाने धीरज साहू यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलेय. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.