सोलापूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले असून सकाळी नऊ वाजता त्यांचं मुंबईहून सोलापूर विमानतळावर आगमन झालं. लगेच ते अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीची आणि महापूराची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. दुपारपर्यंत ते सोलापुरात येणार असून सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय घोषणा करणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांचे आणि महापुरात नुकसान झालेल्या हजारो लोकांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील सोलापूर दौऱ्यावर असून ते माढा आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत त्यामुळे या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नक्की काय पडणार हे लवकरच समजणार आहे.