येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, आणि चितळे क्लिनिकच्या संस्थापक डॉ. मंजिरी चितळे यांचे आज बुधवार दिनांक २ मार्च रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात लंडनस्थित मुलगा डॉ. सुधांशू, सून डॉ. किरण आणि मुलगी सोलापुरातील प्रसिद्ध प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी, जावई यतिन शहा आणि नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. मंजिरी आणि डॉ. विनायक चितळे यांनी १९६८ च्या दरम्यान सोलापुरात चितळे क्लिनिक नावाने वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. डॉ. मंजिरी चितळे यांनी अल्पावधीतच स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांचा विश्वास संपादन केला. डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून लौकिक मिळवला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चितळे क्लिनिक ने मूल्याधिष्ठित वैद्यकीय सेवेतून स्वतःचं वेगळा ठसा उमटवला आहे.
डॉ. मंजिरी चितळे सोलापूर महापालिकेच्या वतीने आयोजित चीन भेटीच्या दौऱ्यात शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या. चीन भेटीच्या अनुभवावर आधारित “चीनच्या भिंतीपलिकडे” नावाचे पुस्तकही प्राकशित झाले आहे. चित्रपट, नाटक, कला, साहित्य अशा अनेक विषयात त्यांना रुची होती. सोलापुरातील प्रत्येक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची.