सोलापूर : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिल्ली येथे भेट देऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी, राज्यातील जवळपास २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करून शंभर टक्के न्याय देऊ असा विश्वास व्यक्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी समाविष्ट झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. अशा प्रकारची याचिका सर्वो च्च न्यायालयात दाखल केली होती. सदर खटला सुनावणीस येत नव्हता. याबाबत खटला पुढे नेणारे अॅड. देसाई यांना भेटून सुनावणी तारीख आता मिळालेली आहे. सदर खटल्याची ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तारीख निश्चित मिळेल, सुनावणी सुरू होईल व सर्व पेन्शनधारकांना जुन्या पेन्शनचा लाभ शंभर टक्के मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता की, अॅड. माहेश्वरी हे बदलून गेले आहेत. त्यामुळे आपला खटला सुनावणीस येत नाही. आपल्याला न्याय मिळत नाही. परंतु तिथे गेल्यानंतर खुलासा कळाला की माहेश्वरी नावाचे दोन वकील त्या ठिकाणी होते. आपला खटला ज्यांच्याकडे आहे ते कसोशीने काम पाहून आपली प्रकरण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अॅड. माहेश्वरी यांचा वेळ घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, शंभर टक्के आपला खटला सुनावणीस येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय सावंत यांनी दिली.