उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट केलं. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजपसोबत जाण्याबाबत आमच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला मूर्त स्वरुप आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेला जातीयवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि आम्ही गेलो. जर ज्या पक्षाला जातीयवादी म्हटलं जातं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर मग भाजपसोबत जाण्यात काय अडचण आहे?, असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत गेलो आहोत. मग महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.