बारामती: गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते
यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी देशभरात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सावधपणे भाष्य केले. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार काय करतय यावर आमचं लक्ष आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.