नवी दिल्ली : आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? अशी खंत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
जी २३ ने काँग्रेस पक्षात सुचवलेल्या सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “ही एक गोष्ट आहे ज्याबद्दल मला खंत आहे. या पक्षाचा १२५ वर्षांचा इतिहास आहे आणि गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. यामुळे मलाही वाईट वाटते . हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे अध्यक्ष हवा. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाची घसरण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. काँग्रेस नेत्यांच्या या धाडसी पत्रामुळे त्यावेळी खळबळ माजली होती. या पत्रात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी करत नेतृत्वासंबंधीही मत व्यक्त करण्यात आले होते .शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मॉडेल देशभरात राबवण्याच्या प्रस्ताव दिल्यासंबंधी विचारण्यात आले असता कपिल सिब्बल म्हणाले की, “५२३ मतदारसंघांमध्ये हे करण अशक्य आहे. पण जरी आम्ही ४०० उमेदवार दिले तरी भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. आम्हाला अशाच पद्धतीने एकत्र काम कराव लागेल. विरोधकांमध्ये मतांतर येऊन फूट पडू शकते. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण शेवटी आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायच आहे”. कपिल सिब्बल यांना डिनर बैठकीत अकाली दलचे नरेश गुजराल यांनी काँग्रेसने गांधी कुटुंबाच्या हातातून बाहेर पडले पाहिजे असे मत व्यक्त केल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “हे आमचे ध्येय नाही आणि याआधीही नव्हते . आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचे आहे. त्यांनी आपले मत व्यक्त केले असून फक्त एका व्यक्तीच्या मतावरुन अर्थ काढण्याची गरज नाही”. देशातील लोकांना भाजपा नको असून आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे असे यावेळी त्यांनी सांगितले .