सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत : उद्योगवर्धिनी संस्थेचा परिवार उत्सव कार्यक्रम उत्साहात
सोलापूर : समाजातील दुःख ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची प्रेरणा आहे. हीच धारणा घेऊन स्त्री सक्षमीकरणासाठी प्रचंड मोठे कार्य करणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेचा वैभवसंपन्न राष्ट्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा ठरणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी सोलापुरात केले. उद्योगवर्धिनी संस्थेचा परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साही वातावरणात झाला. महिला सक्षमीकरणासाठी अखंड कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, सेवाभारतीचे सोलापूर शहर अध्यक्ष राजेश पवार, उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान, सचिवा मेधा राजोपाध्ये उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित ‘उद्योगवर्धिनी की सेवाव्रती’ या नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि जेष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. तसेच अखंड यात्रा या माहितीपटाचेही उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले.याप्रसंगी डॉ. भागवत यांना उद्योगवर्धिनीच्या महिलांनी बनविलेल्या दोहड, विलायची हार, वॉल हँगिंग, श्री शुभराय महाराजांवरील पुस्तक, पूजा भूमकर यांनी भरतकामाच्या माध्यमातून साकारलेली सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. भागवत म्हणाले, राष्ट्राला मोठे करण्यासाठी सर्व समाजाने स्वार्थ, भेद विसरून एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. सेवा करणारा नेहमी दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर काढून त्याला दुसऱ्याला मदत करण्यासाठी प्रवृत्त करतो. उद्योगवर्धिनीचे दुःख निवारणाचे कामही असेच अहंकार विरहित, सहजकर्तव्य भावनेचे आणि आपलेपणाचे आहे. समाजाच्या प्रगतीत महिलांचा वाटा सर्वात मोठा असतो. महिला घटक उन्नत होणे ही राष्ट्राच्या उत्कर्षासाठी आवश्यक बाब आहे. तर संपूर्ण समाजाचा उद्धार करते उद्योगवर्धिनी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, महिलांचे जीवन प्रकाशमय करण्याचे अखंड कार्य उद्योगवर्धिनी करत आहे. हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबी, सक्षम करून कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे.
उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, समाजातील वंचित शोषितांची सेवा ही करण्याची नव्हे तर अनुभवायची बाब आहे. प्रचंड क्षमता असूनही सोलापूरकरांचा कल पुणे, मुंबईकडे वाढत आहे. त्यामुळे सोलापुरातील मुलींना आणि महिलांना सोलापुरातच प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगार, व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.
उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. माधवी रायते यांनी आभार प्रदर्शन केले.




उद्योगवर्धिनीच्या महिला प्रशिक्षण केंद्राच्या स्वप्नपूर्तीसाठी करणार सहकार्य
उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविकात महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता समाजाने योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डी. राम रेड्डी यांनी उद्योगवर्धिनीच्या महिला प्रशिक्षण केंद्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
१०० टक्के पर्यावरणपूरक कार्यक्रम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नित्य कार्यात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आग्रह धरला जातो, याची प्रचिती पुन्हा एकदा सोलापूरकरांना आली. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर लावलेला फलक, सजावट आणि इतर सर्व वस्तू पर्यावरणपूरकच वापरण्यात आल्या होत्या.