सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी तसेच सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर नगरपालिका आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. सुरुवातीला सोळाशे क्युसेक वेगाने तर त्यानंतर 6000 क्युसेक हे पाणी सोडले जाणार आहे. डाव्या कालव्यातून शेतीसाठी गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली पाणी कालच बंद करण्यात आले.

आता उद्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले जाणार आहे. हे पाणी सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे. अर्धा टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी नदीवाटे सोडावे लागते. 123 टीएमसी एवढे पाणी साठलेल्या उजनी धरणात सध्या 98 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. मार्च आणि एप्रिल मध्ये पुन्हा शेतीसाठी पाण्याचे आवतण सोडले जाणार आहे. मात्र यंदाच्या वर्षी उजनी धरणात भरपूर पाणी असल्यामुळे उजनी मायनस मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. तरीही पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे कारण कालव्यातून शेतीसाठी सोडलेले पाणी गरजे पेक्षा जास्त झाले. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये मार्च एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासणार आहे याचा विचार लाभक्षेत्र प्राधिकरणाने तसेच जिल्ह्यातील आमदारांनी करणे गरजेचे आहे