ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ एस आर पी कॅम्प, सोरेगाव यांचे माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते. त्या प्रवचना मध्ये ते बोलत होते की,वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आहे. वारी ही विश्व कल्याणाचा संस्कार देणारी आदर्श परंपरा असून शाश्वत सुख प्रदान करणारी व्यापक परंपरा आहे. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात
पंढरीची वारी जयाची ये कुळी |
त्याची पाय धुळी लागो मज ||
वारकरी हा किती श्रेष्ठ आहे ते या अभंगावरून कळण्या सारखे आहे.
वारी परंपरा हा अनमोल संस्काराचा ठेवा आहे.
तसेच पंढरीची वारी ही परंपरा विलक्षण असून अनमोल संस्काराचा ठेवा आहे. वारीकडे पाहताना रूढ किंवा धार्मिकता फक्त या दृष्टीने पाहिलं जातं परंतु वारी हा विचार खूप व्यापक असून समाज उपयोगी आहे . वारी म्हणजे पायी चालत पंढरपूरला जाणे असा मर्यादित अर्थ नाही. जात पात, पंथ भेद, वर्ण आश्रम अशा अनेक विभागातून विखुराला जात असलेला समाज वारीच्या माध्यमातून एकत्रित केला गेला आणि केला जात आहे . या सोहळ्यात सर्व जाती धर्माचे, सर्व पंथ आश्रमाचे भाविक कोणता ही विचार न करता एकत्रित होतात. स्त्री पुरुष- श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी अशा सर्व भिंती बाजूला ठेऊन एक छत्र स्वीकारतात म्हणजेच एक नेतृत्व स्वीकारतात. शिवाय त्याचे कोणते ही अवडंबर केले जात नाही. वारी हा एक खूप मोठा आदर्श असून अत्यावशक गरज आहे. या परंपरेवर , आपल्या संस्कृतीवर पूर्वी अनेक आक्रमण झाले तरी ही परंपरा थांबली नाही . कारण ही व्यक्ती केंद्रित नसून समाज केंद्रित आहे.
वारी हा विषय केवळ समजून घेण्याचा नाही तर तो अनुभवण्याचा आहे. प्रत्येक संतांनी वारीचा स्वानुभव अभंगातून व्यक्त केला आहे. परंतु प्रत्येक संतांनी वारीचे वेगळेपण मांडले आहे. वारीची मुख्य दिशा , मुळ बैठक, रचना या सर्व गोष्टी मागे समाज हित हेच एकमेव कारण दिसून येते. म्हणून ही परंपरा पिढ्यानपिढया सुरक्षित असून श्रद्धा संपन्न आहे. शिवाय डोळस म्हणजे विवेक अधिष्ठित आहे .वारीचे महत्त्व सांगून पसायदान घेऊन नंतर महाप्रसादचे ही आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अध्यक्ष संभाजी शिंदे , उपाध्यक्ष सिंधू देसाई, मंगल दीक्षित, श्रीमंत सुतार, मदन दुधभाते,दिलीप पवार, इ. यांनी परिश्रम घेतले.