प्रिसिजन आणि भगीरथ संस्थेच्या माध्यमातून बायोगॅस प्रकल्प प्रशिक्षण शिबिर संपन्न
सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशन व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बोलवाडी,शेटफळ (ता. मोहोळ) येथे बायोगॅस प्रकल्प प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ४ तालुक्यातून जवळपास सहा प्रशिक्षणार्थींना दिनांक 17 ते 21 एप्रिल दरम्यान आधुनिक बायोगॅस बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या डॉ.सुहासिनी शहा, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, चिंचणी(ता. पंढरपूर) चे मोहन अनपट, सोलंकरवाडीचे राजाभाऊ भांगिरे, तानाजी इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. देवधर यांनी बायोगॅस चे महत्व पटवून दिले. बायोगॅस मुळे स्वच्छ इंधन तर मिळतेच शिवाय स्लरीचा वापरही गांडूळ खता साठी शेतकऱ्यांना होतो. इंधन व खत देणारा बायोगॅस हा शेतीचा कल्पवृक्ष आहे. एका गाईचे शेण व गोमूत्र बायोगॅस मध्ये टाकल्यास तीन माणसांचा स्वयंपाक होतो. गावे इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. भगीरथ मार्फत आजपर्यंत जवळपास ९००० बायोगॅस प्रकल्प पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना डॉ. सुहासिनी शहा यांनीआपले मनोगत व्यक्त केले. प्रिसिजन मागचं अनेक वर्षांपासून सीएसआर च्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवित आहे, ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्णतेसाठी प्रिसिजन कटिबद्ध असलायचं त्यांनी त्यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात “धूरमुक्त व सिलेंडर मुक्त गाव” कसे होईल यासाठी प्रिसिजन भगीरथ बायोगॅस’ प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील ५ गावांमध्ये राबविला जाणार आहे असे त्यांनी त्यावेळी सांगितले.
‘प्रिसिजन भगीरथ बायोगॅस’ प्रकल्प-
प्रिसिजन फाउंडेशन व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हातील खेड ता उत्तर सोलापूर, सोलनकरवाडी ता माढा, शेटफळ ता मोहोळ, चिंचणी ता पंढरपूर या गावांमध्ये सुरवातीला प्रिसिजनच्या माध्यमातून १० बायोगॅस तयार करून दिले जातील. हे बायोगॅस चे तंत्रज्ञान व बांधणी हे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने होईल. प्रायोगिक १० बायोगॅस बनवून झाल्यानंतर प्रशिक्षित झालेल्या गवंड्यामार्फत गावातील इतर लाभार्थ्यांचे बायोगॅस बांधले जातील. या प्रकल्पाला पंचायत समिती मार्फत अनुदान हि दिले जाते त्यासाठी प्रिसिजन प्रशासनासोबत समन्वय साधून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करेल. हा प्रकल्प संपूर्णपणे लोकसहभागातून चालविला जाणार आहे.
सरपंचांनीही घेतले गवंडी कामाचे प्रशिक्षण –
यावेळी सोलंकरवाडी येथील राजाभाऊ भांगिरे यांनी येत्या वर्षात सोलंकरवाडी गाव पूर्णपणे सिलेंडर मुक्त करण्याचे आव्हान स्वीकारले. गावात जवळपास दीडशे कुटुंबे असून प्रत्येकाच्या घरी आधुनिक बायोगॅस संयंत्र बसवून गॅस सिलेंडर वरती प्रत्येक कुटुंबाचा वर्षासाठीचा होणारा जवळपास आठ हजार रुपयाच्या खर्चाची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चळवळीचा भाग म्हणूनच सरपंच बाबासाहेब पांढरे यांनीही बायोगॅस बांधकामाचे प्रशिक्षण स्वतः घेतल्याचे त्यांनी सांगितले.
बायोगॅस निर्मितीचे हे आधुनिक तंत्रज्ञान असून या नवीन प्रकारच्या बांधकामामुळे गॅस गळती होत नाही. यापूर्वीची बांधकामे सदोष असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात होता. भगीरथकडून दिले जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये बांधकाम पूर्णपणे निर्दोष केले जाते. माझ्या शेतात याचा प्रात्यक्षिक प्रकल्प पूर्ण केला आहे असे संजय वागज, शेटफळ, ता. मोहोळ यांनी आपला अनुभव सांगितला.