श्रीक्षेत्र पंढरपूर येथे माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. वसंत पंचमी अर्थात 23 जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सकाळी 11 वाजता विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येते, त्यानंतर विठ्ठलास विवाहस्थळी येण्याचे आमंत्रण देण्यात येते. रुक्मिणी मातेस पांढरा पोशाख व पारंपारिक अलंकार परिधान करून पाद्यपूजा, नैवेद्य व आरती केली जाते. दुपारी बारा वाजता विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती विठ्ठल सभा मंडपात आणून विवाह सोहळा विधिवत पार पडतो. त्यानंतर दुपारी चार वाजता पोशाखानंतर पाद्यपूजा केल्यानंतर मिरवणूक निघणार आहे. वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार आहे.

