सोलापूर- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सन १९८४ मधील तत्कालीन विद्यार्थी मित्रांनी तब्बल ३८ वर्षांनी एकत्र येऊन, नुकताच स्नेह मेळावा संपन्न केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान प्राचार्य अभि. सोमनाथ हुनसिमरद सर यांनी आत्ताच्या विद्यार्थ्यांना शुध्द पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी जलशुद्धीकरण व शीतकरण संयंत्र संच बसवून देण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देण्यासाठी या सर्व मित्रांनी लगबग करून, सुमारे ८०० विद्यार्थ्यांना शुध्द व थंड पाणी पुरवठ्याची सोय होणारे संयंत्र, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या इमारतीत कार्यान्वित करून, ते विद्यार्थ्यांच्या सेवेत नुकतेच सादर केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य अभि. सोमनाथ हुनसिमरद, कर्मशाला प्रमुख डॉ. प्रशांत किल्लेदार, प्रा. अंजिखाने, प्रा. मिट्टापल्ली, प्रा. साठे, विटेकर, हंचाटे, राऊत तसेच, माजी विद्यार्थी अभि. राजशेखर जेऊरकर, अभि. राजकुमार शेळके, अभि. रमेश खाडे, अभि.जगदीश निलाखे, अभि. अशोक कांबळे यांच्यासह कर्मचारी वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सुरुवातीला प्राचार्य हुनसिमरद सरांच्या हस्ते संयंत्राचे पूजन व प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अनिल राठोड याच्या हस्ते तोटी फिरवून, औपचारिक उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सन १९८४ मधील सर्वच स्नेही मित्रांचे तत्पर सेवापूर्ती बद्धल अभिनंदन करून, आत्ताच्या विद्यार्थ्यांना या उपकरणांचा लाभ घेताना, त्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, अभि. रमेश खाडे यांनी आपल्या शाहिरी ढंगात जलसाक्षरतेची लावणी सादर करून, जलजागर केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्मशाला विभागाचे कर्मचारी सर्वश्री जाधव, इंगळे, करडे आदींनी सहकार्य केले.