येस न्यूज मराठी : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. कर्णधार म्हणून रोहितचं हे पाचवं तर खेळाडू म्हणून सहावं विजेतेपद ठरलं. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत रोहितकडे नेतृत्व सोपवण्याच्या मागणीला जोर धरु लागला आहे. अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या मागणीला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैननेही सहमती दर्शवली आहे.
“रोहितची कर्णधारपदाची शैली, मैदानात त्याचं डोकं शांत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना रोहित चांगल्या फॉर्मात असतो हे त्याने सिद्ध केलंय. कदाचीत आता विराटने टी-२० चं कर्णधारपद सोडण्याची वेळ आलेली आहे. रोहितने आता भारतीय संघाचं नेतृत्व करावं. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये केलेला विक्रमच याची साक्ष देतात.” Sky Sports ला दिलेल्या मुलाखतीत हुसैन बोलत होता.