येस न्युज मराठी नेटवर्क । अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटॉल इमारतीबाहेर जोरदार गोंधळ घातला असून हिंसाचार केला आहे. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घालत हिंसाचार करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यावेळी झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी गोळीबार केला असता एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आता ही संख्या चारपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान हिंसाचार करणाऱ्या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच कॅपिटॉलमधील हिंसाचार प्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली.