जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सूचना
सोलापूर : जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या 166 पैकी 131 गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप 35 गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. संबंधित गावांमध्ये शिवार फेरी तात्काळ पूर्ण करून निवडलेल्या सर्व गावांचा गाव आराखडा आठवडाभरात सर्वोच्च प्राधान्याने तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती जलयुक्त शिवार 2.0 च्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि. प.) पी. बी. भोसले, वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. जे. शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव द. यो. दामा यांच्यासह उपविभागीय जलसंधारण अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, जलयुक्त शिवार 2.0 साठी गावे निवडून एक महिना पूर्ण झाला आहे. परिणामी गाव आराखडा तयार करणेकामी जलसंधारण, कृषि अशा संबंधित सर्व विभागानी परस्पर समन्वय ठेवावा. येत्या आठवडाभरात, संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन, सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय साधून, आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुढील आठवड्यानंतर पुन्हा याबाबत आढावा घेण्यात येईल, तोपर्यंत सर्वच तालुकास्तरीय समित्यांनी, गाव आराखडा पूर्ण करून, जिल्हा समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रारंभी डी. वाय. दामा यांनी शिवार फेरी व गाव आराखडा कामांचा तालुकानिहाय प्रगती आढावा सादर केला.