सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ शुक्रवार, दि. 5 मे 2023 रोजी पूर्ण होत असून यानिमित्त त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
हा गौरव सोहळा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार असून या समारंभास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच समारंभात प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांचा ही सेवापूर्तीनिमित्त गौरव केला जाणार आहे. यावेळी गौरव समितीच्या अध्यक्षा तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि. 5 मे 2018 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारून डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची चौफेर प्रगती झाली आहे. यानिमित्त विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांचा गौरव केला जाणार आहे. याच समारंभात गौरव समितीकडून तयार करण्यात आलेल्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. या समारंभास विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे तसेच वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी केले आहे.