सोलापूर – माघ यात्रेसाठी अंदाजे ३ ते ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याने गर्दी व्यवस्थापन व अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माघ शुद्ध एकादशी निमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या माघ यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षितता, दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 26 व 27 जानेवारी 2026 कालावधीत सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत व दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी रात्री 00.00 पासून ते दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील मंदिर परिसर ते महाद्वार चौक परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कलम 34 (ब) अन्वये वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.
या आदेशानुसार पुढील कृतीस मनाई करण्यात येत आहे.
• श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदिर परिसर व पुढे महाद्वार चौक परिसर हा भाग दुचाकी, चारचाकी व इतर सर्व वाहन चालवणे तसेच पार्किंग करणे.
• मंदीर परिसरात छोट्या छोट्या अरुंद रस्त्यावर वाहने लावणे.
या आदेशातून खालील वाहनास सूट देणेत येत आहे.
• शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे, मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झालेनंतर सदरच्या आदेशातून सूट राहील. तथापि, शासकीय कर्तव्य, मंदीरातील कर्तव्य याशिवाय इतर बाबीसाठी शासकीय व मंदीर समितीचे वाहन, कर्मचारी वाहन याचा वापर केला जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
• या कालावधीमध्ये याठिकाणी येणा-या भाविकांच्या वाहनाची पार्कंग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करणेत यावी. सर्व गल्ली बोळातून दुचाकी येणार नाही, यासाठी नगर परीषद यांनी बॅरीकेड्स लावणेत यावेत. याबाबत नगरपरीषदेने व्यापक प्रसिध्दी द्यावी.
• मंदीर परीसरात राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता नमुद कालावधीसाठी पास देणेची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. पासधारक व्यक्तींना त्यांचे वैयक्तीक कारणासाठी मुभा राहणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
• मंदीर समिती कर्मचारी व पोलीस कर्मचारी पास घेतील व त्यांना ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पार्कीग करतील.
• मंदीर परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिकांचे मालाची ने-आण करणेकामी पोलीस प्रशासन यांनी त्यांचेशी चर्चा करुन भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी ठराविक वेळ निश्चीत करुन त्यादरम्यान अशी वाहतूक होईल, याची खबरदारी घ्यावी.
• महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळयापासून ने-आण करणेकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी.
• पंढरपूर शहर पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणेचे दृष्टीने योग्य ती कार्यवाही करणेत यावी. तसेच आदेशाचा भंग करणारे यांचेविरुध्द आदेशात नमूद कायद्यान्वये कारवाई करणेत यावी. त्या अनुषंगाने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करुन सदर वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच सदर वाहनावर मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार मोठ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी. सदर रक्कम वाहनधारकांकडून रोखीने वसुल करण्यात यावी. दंडात्मक कारवाईची संपूर्ण रक्कम वसूल झाल्याशिवाय सदरील वाहन कार्यमुक्त करण्यात येवू नये. दंडात्मक रक्कमेची वसूली केलेल्या वाहनांची माहिती तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पंढरपूर यांचेकडे दर सोमवारी सादर करण्यात यावा.
सदरच्या आदेशाचे उल्लंघन झालेस उल्लंघन करणारेविरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये कारवाईस पात्र राहिल असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
