सोलापूर – जनजाती कल्याण आश्रम, प. महाराष्ट्र शाखा सोलापूर यांच्यावतीने रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत वनभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सोलापूर शाखेचे अध्यक्ष विनय वरणगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा वनभाजी महोत्सव हरिभाई देवकरण प्रशालेच्या आवारातील एस. पी. एम. इंग्लिश मीडियम शाळेच्या प्रांगणात होणार असून याचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता वनबंधू पद्मश्री श्री चैत्राम देवचंद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटक वनबंधू माननीय पद्मश्री चैत्राम देवचंद पवार हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील रहिवासी आहेत. या महोत्सवात वनभाज्यांची माहिती देणारे चित्र प्रदर्शनही असणार आहे.
या महोत्सवामध्ये भीमाशंकर खोऱ्यातील जंगल क्षेत्रात फक्त पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवून येणाऱ्या औषधी गुणधर्म युक्त दुर्मिळ आशा कुरडु, चिंचरडा, चैताचा बार, तेरची, भारंगी, रताळी, काठ माठा, सोडगा, कोकम पाला, कवला, करड्या इत्यादी वनभाज्या घेऊन जनजाती बंधू-भगिनी येणार आहेत. या भाज्या जनजाती भगिनी इथेच शिजवून त्याचा आस्वाद सोलापूरकरांना देणार आहेत. यात नाचणीची भाकरी, वनभाजी, आंबिल व कोकमपाला कढी यांचा समावेश असणार आहे. या आगळावेगळ्या महोत्सवास सोलापुरातील नागरीकांनी अवश्य भेट देवून दुर्मिळ वनभाज्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विनय वरणगावकर यांनी केले आहे.