मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडी अपघात झाला आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी वरुण आणि नताशाचे कुटुंबिय अलिबागला पोहोचले आहेत. मात्र, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. वरुण आलिबागला जात असताना हा अपघात झाला आहे. मात्र, यामध्ये वरुणला कोणताही दुखापत झाली नाही. त्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे.
मॅन्शन हाऊसभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, तर प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जेणेकरून लग्नात कोणताही हस्तक्षेप होणार नाही. लग्नात काम करणा कर्मचार्यांनाही विशेष विनंती करण्यात आली आहे. डेव्हिड धवन हे लग्न खूप खासगी ठेवू इच्छित आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लग्नात काम करणा कर्मचार्यांकडून त्यांचा सेल फोन वापरण्यास नकार दिला आहे, जेणेकरुन कोणीही फोनवरुन लग्नात व्हिडिओ बनवू नये.
वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
वरुणची जिवलग मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टही लग्नाला हजेरी लावणार आहे. यावेळी, ती एकटी येणार नाही तर, रणबीर कपूरबरोबर या विवाहसोहळ्यात सामील होणार आहे. आलिया सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. पण, शूटिंगमधून ब्रेक घेत ती अलिबागला वरुणच्या लग्नात हजेरी लावणार आहे.