दि 28 जानेवारी 2023 रोजी सोलापूर-विजयपूरा बाह्यवळण मार्गावर देशमुख वस्ती येथील अंडरपासवर पडून “त्या” १४ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज 9 दिवस झाले, अद्याप प्रशासनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. तसेच अशा घटना भविष्यात होऊ नये आणि दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी त्वरित विविध उपायोजना कराव्यात यासंदर्भातील आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, वनविभाग तसेच महामार्ग प्राधिकरण यांना देण्यात आले होते. परंतु याठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसेथेच असून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर ज्या पुलावरून कोसळून “त्या” दुर्दैवी 14 काळविटांचा मृत्यू झाला होता त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील विविध पर्यावरणीय संघटनाकडून घटनास्थळी मेणबत्त्या लावून तसेच फुले अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या दुर्घटनेला जबाबदार संबंधित प्रशासन, महामार्ग प्राधिकरण तसेच वन विभाग यांना दुर्घटनास्थळी योग्य उपाययोजना करण्यासाठी निवेदन देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या आंदोलनाचे रूपांतर चळवळीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी किती मुक्या जीवांचे बळी घेतल्यानंतर या संदर्भातील उपायोजना करणार असा संतप्त सवाल वन्यजीवप्रेमीतुन विचारला जात आहे. तसेच या आंदोलनामध्ये सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा व संबंधित दोषी प्रशासनाचा विविध आंदोलनाद्वारे निषेध करावा त्याशिवाय “गेंड्याची कातडी” पांघरलेल्या या प्रशासनाला जाग येणार नाही असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देऊन दोषी प्रशासनाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनावेळी पंकज चिंदरकर, संतोष धाकपाडे, अजित चौहान, सुरेश क्षिरसागर, मयांक चौहान, काशिनाथ धनशेट्टी, राजकुमार कोळी अजय हिरेमठ, अरविंद मोटे, बाळासाहेब लामतुरे, लखन भोगे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे इत्यादी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
