सोलापूर – शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत व एका ठिकाणी देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध विभागांनी योजनानिहाय उद्दिष्ट ठरवून आराखडा तयार करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ढोक यांनी आज येथे केले.
जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियानाच्या पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीस अभियानाचे जिल्हा समन्वयक जिल्हाधिकारी तुषार शिंदे, तहसीलदार अंजली कुलकर्णी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ढोक म्हणाल्या, राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थी उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी विविध विभागांच्या योजनानिहाय आराखडा तयार करावा. जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात यावा. ग्राम स्तरावर काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक , कृषि सहाय्यक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका इत्यादिंची बैठक घेऊन त्यांना या अभियानाची माहिती द्यावी, असे त्या म्हणाल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ढोक म्हणाल्या, या अभियानांतर्गत १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत नागरिकांना विविध योजनांची माहिती देणे व प्रस्तावित लाभार्थींची यादी तयार करणे व त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे अपेक्षित आहे. याचा समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.