आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. तीर्थयात्रा करू इच्छिणाऱ्यांसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत. एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक- १८ वरून पंतप्रधान मोदींनी दोन्ही हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
यात्रेकरूंसाठी वरदान ठरणार
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9 वी वंदे भारत ट्रेन असेल. नवीन ट्रेनमुळे मुंबई आणि सोलापूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुकर होईल. मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही देशातील 10 वी वंदे भारत ट्रेन असेल. ही गाडी महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाणार आहे.