मुंबई : शिवसेना व भाजपात भाषेवरून ‘सामना’ रंगला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातील भाषेबद्दल आक्षेप घेत संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर चंद्रकांत पाटलांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं असून, त्यांच्याकडे भाषेबद्दल तक्रार केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
ईडीच्या नोटीसवरून सध्या भाजपा आणि शिवसेनेत कलगीतुरा सुरू आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत भाजपा नेत्यांवर टीका करताना दिसत आहे. दुसरीकडे ‘सामना’तूनही भाजपा नेत्यांवर टीकास्त्र साधलं जात आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर आता रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
नमस्कार रश्मी वहिनी!
आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपा महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!
वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल.
आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!