सोलापूर : डॉ. पांडव यांनी निरपेक्ष भावनेने देशात रुग्णसेवा केली. नाव मात्र गावाचे होत होते. अशा डॉ. पांडव यांना कर्तृत्व कार्यक्षमता बघून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉक्टरांच्या कार्याची, सहानुभूतीची, विश्वासाची किंमत कोणीच मोजू शकत नाही. शिक्षक व डॉक्टर यांच्यासारखा जगामध्ये चांगले काम करणारा व्यक्ती नाही. कोरोना काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता मानवतेची सेवा केली आहे, असे पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांचे केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी कौतुक केले. शिक्षणापासून जी ताकद मिळते ती मानवाच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन डॉ. खान यांनी केले.
डॉ. चंद्रकांत संभाजीराव पांडव यांना पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्धल देशभक्त संभाजीराव गरड बहुउद्देशिय संशोधन संस्था मोहोळ व पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव नागरी सत्कार समितीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी संदीपान गायकवाड सभागृहामध्ये विशेष सन्मानपत्र देऊन राज्यपाल डॉ.आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याचवेळी वैद्यकिय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. नितीन तोष्णीवाल व डॉ.फाहिम गोलीवाले यांना कै. डॉ. वसंतराव गरड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा 'धन्वंतरी ' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केरळचे राज्यपाल खान हे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मोहोळ नागरी सहकारी बँकेचे चेअरमन कौशिक गायकवाड, अध्यक्ष प्रतापसिंह गरड, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल डॉ. खान म्हणाले, डॉक्टरांच्या प्रती धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे, त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडून काहीतरी शिकले पाहिजे, सभ्य जीवन जगताना करूना भाव पाहिजे. परंपरा, मूल्य आपल्याकडे नसतील व केवळ शिक्षण असेल तर दानव बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्यांनी आपल्या भाषणात संस्कृतचे विविध श्लोक सुभाषिते उदाहरणे म्हणून सांगत मानवतेची सेवा, करूणाभाव, परंपरा मूल्यांची जपणूक हेच माणसाने अंगीकारले पाहिजे, असे सांगितले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले की, एम्समध्ये हजारो रुग्णांना बरे करण्याचे काम करणाऱ्या डॉ.पांडव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे हा मोठा गौरव आहे. त्यांच्या गावात झालेल्या सत्काराला एक आगळेवेगळे महत्त्व आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पांडव म्हणाले की, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी माझे 30 सत्कार झाले आहेत, परंतु हा सगळ्यात महत्त्वाचा अविस्मरणीय सत्कार आहे. मोहोळकरांच्या या सत्काराच्या निमित्ताने मी भीष्म प्रतिज्ञा करतो की, माझ्या मामाच्या या मोहोळ शहराला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या माध्यमातून रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी सर्वसोयींनी युक्त ट्रामा सेंटर व श्रीक्षेत्र मोहोळ व वडवळच्या नागनाथ मंदिराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.