सोलापूर, दि. ३०(जिमाका): – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो, याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वर बंदी लागू केली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉल्बी सिस्टीममुळे काही भाविकांना कान व छातीस त्रास होऊन गंभीर आरोग्यविषयक परिणाम झाल्याचे निर्देशनास आलेले आहे. तसेच लेझर लाईटमुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन बुबळ व पडद्याला इजा झाल्याची नोंद आहे.
सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ध्वनी व प्रकाश प्रदूषण टाळणे आवश्यक असल्यामुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.