सोलापूर, दि. 15- शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा योग्य वापर व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्यावतीने ‘एक पृथ्वी, एक भविष्य: शाश्वततेसाठी विज्ञानांचे एकत्रीकरण’ या संकल्पनेवर पी एम उषा अनुदान अंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस युनिव्हर्सिटी ऑफ केलनिया (श्रीलंका) यांचे सहकार्य लाभले. उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. दामा यांनी शाश्वत विकासाच्या मूलभूत संकल्पना, भूशास्त्रातील बदलते आयाम आणि पर्यावरणविषयक जागरूकतेचा आलेख उलगडून दाखवला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भूशास्त्र संकुल संचालक डॉ. विनायक धुळप, डॉ. थारा प्रभाकरन उपस्थित होते. श्रीलंकेमधून प्रा. गुणथीलीका (अधिष्ठाता, सामाजिकशास्त्र) आणि प्रा. लाल मिरविन धर्मश्री यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
परिषदेतील प्रमुख वक्ते डॉ. बलराम यांनी ‘एक पृथ्वी – एक भविष्य’ ही संकल्पना वेळेची गरज असल्याचे नमूद केले. ऊर्जा सुरक्षितता, औद्योगिक प्रगती आणि हवामान शाश्वतता या दृष्टीने क्रिटिकल मिनरल्स – जसे लिथियम, कोबाल्ट, निकेल, रेअर अर्थ एलिमेंट्स – अनिवार्य झाले आहेत, असे ते म्हणाले. डॉ. थारा प्रभाकरन यांनी परिषदेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ही परिषद म्हणजे फक्त शैक्षणिक उपक्रम नसून, भविष्यातील शाश्वत जगाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. हवामान बदल, तापमानवाढ, अनियमित पर्जन्यमान यांसारख्या संकटांवर विज्ञान व धोरण निर्मितीचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस श्रीलंका, स्वीडन, अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया यासह भारतातील विविध राज्यांतून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बडोदा, पश्चिम बंगाल, केरळ मधील 240 हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदवला. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सोविनार पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संकुलाचे संचालक व आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक प्रा. डॉ. विनायक धुळप यांनी केले. सूत्रसंचालन सुलभा बनसोडे यांनी केले, तर आभार डॉ. अनिल येडगे यांनी मानले.