सोलापूर – प्रविण गायकवाड यांंनी सोलापूरची समग्र माहिती देणारे मोबाईल ऍप विकसित करून सोलापूरच्या पर्यटन विकासाची फार मोठी गरज पूर्ण केली आहे असे प्रतिपादन आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सोमवारी सोलापुरात बोलताना केले.सोलापुरातले युवा छायाचित्रकार प्रविण गायकवाड व अक्षय जिंदे या युवकांनी विकसित केलेल्या एमएच १३ आपलं सोलापूर(MH13 aapla solapur) या ऍप्लीकेशनचे अनावरण करताना आ. देशमुख बोलत होते.
गायकवाड यांनी सोलापुरातली अनेक सौंदर्यस्थळं समाज माध्यमावर टाकून ती लोकप्रिय केली आहेत. आता त्यांनी आपला हा छंद आणि कला अधिक विस्तारित करून सोलापूरचे हे मोबाईल ऍप्लीकेशन तयार केले आहे. सोलापूरकडे अनेक पर्यटक आकृष्ट होत आहेतच पण आता सोलापूरचे ब्रँडिंग करायला आणि आलेल्या पर्यटकांना नेमकी अधिकृत माहिती द्यायला हे ऍप अधिक उपयुक्त ठरेल असे सुभाषबापू या प्रसंगी बोलताना म्हणाले.
या ऍप मध्ये सोलापूरचा इतिहास, शहरातील धार्मिक स्थळे, लगतची धार्मिक ठिकाणे, शहर आणि आसपासच्या भागातली पर्यटन स्थळे यांची सुंदर माहिती दिली आहे. शिवाय शहरातली मोठी महाविद्यालये, विद्यापीठ, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी आणि हॉटेल्स यांचीही माहिती दिलेली आहे.
शहरातील महत्त्वाच्या सोयी आणि कार्यालये यांची माहिती, पत्ते आणि फोन क्रमांकही या ऍपमध्ये दिलेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर बसस्थानकापासून सुटणार्या बस गाड्यांचे वेळापत्रकही सादर करण्यात आले आहे. शहरातल्या या ऍपमध्ये पर्यटन गाईडशिवाय टॅलेंट हा विभाग आहे. कोणत्याही युवकाला किंवा कलाकाराला आपली कला पेश करायची असेल तर त्याला ती संधी देणारा तो विभाग असेल.
विशेष म्हणजे सोलापुरातल्या लोकांना उपयुक्त ठरेल अशी काही संकेतस्थळे आणि लिंक्सही या ऍपमध्ये आहेत. ज्यामुळे सोलापूरकरांना आपला व्यवसाय विकसित करता येईल.
यात सोलापुरातील खाद्य संस्कृतीचेही एक स्वतंत्र दालन आहे. आणि सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची इतिहासापासूनची सविस्तर माहिती आहे.
या शिवाय हे ऍप अधिक माहितीपर आणि उपयुक्त व्हावे यासाठी कोणाला काही सूचना करायच्या असतील तर अशा लोकांनी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासाठी संपर्क साधायचा फोन क्रमांक ७९७२३४३८०९ असा आहे.