येस न्युज मराठी नेटवर्क । विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डेटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला. या विरोधात विरोधक आक्रमक झाले. मागासवर्गीय आयोग नेमून तो डाटा राज्य सरकारने मिळवावा असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
धक्काबुक्की झाली नाही, भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात आपलं म्हणणं मांडलं. यावर विरोधीपक्षाने आक्षेप घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तालिका अध्यक्षांनी म्हणणं न ऐकताच सभागृह तहकूब केलं. त्यानंतर विरोधीपक्षाच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना त्यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. तेव्हा तिथे काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र धक्काबुक्की झाल्याचे आरोप भाजपा आमदारांनी फेटाळून लावले आहेत.