कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर: संशोधन, कौशल्य विकासासाठी होणार फायदा
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मलेशिया विद्यापीठासह तीन विविध संस्थांशी सामंजस्य करार झाला. यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, कौशल्य विकास, शिक्षक आणि विद्यार्थी यांची तसेच अभ्यासक्रमांची देवाणघेवाण होणार असल्याची भावना कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली आहे.
तीन पैकी एक असलेल्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये मलेशिया येथील आयएनटीआय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मलेशियाचा समावेश आहे. सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन कक्ष सभागृहात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी मलेशिया विद्यापीठाचे प्रा. डॉ. कुमार कृष्णन आणि प्रा. डॉ. फु किम उपस्थित होते. कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्र कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, आयआयएलच्या संचालिका प्रा. डॉ. अंजना लावंड आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर वामसी लॅब, सोलापूर या आस्थापनेबरोबरही सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कंपनीचे अरविंद रेड्डी आणि श्री. नागराज, दत्तात्रय शिंदे आणि अजित कांगे उपस्थित होते. संशोधन, कौशल्य विकास आणि मनुष्यबळ विकास या बाबींसाठी करार झाला आहे. तिसरा सामंजस्य करार नांदी फाउंडेशन, पुणे या संस्थेबरोबर झाला आहे. यावेळी सीमा भागवत उपस्थित होत्या. संवाद कौशल्य आणि रोजगार क्षमता विकासासाठी करार झाला आहे.
या करारामुळे संशोधन, नोकरी आणि कौशल्य विकाससाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मदत होईल, अशी अपेक्षा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली आहे.