रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. त्यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आठवले यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
रामदास आठवले हे वाईवरून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी एका कंटेनरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात वाहनाच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या गाडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
बुधवारच्या महाडच्या कार्यक्रमानंतर आठवले महाबळेश्वरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेले होते. महाबळेश्वरमध्ये त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर ते वाईला आले होते. वाईवरून ते मुंबईला येत असताना खंडाळा बोगद्यात हा अपघात झाला.
अपघातात गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. आठवले यांच्याबरोबर त्यांची पत्नी सीमा आणि त्यांच्या सासुबाई (सीमा यांच्या आई) होत्या. सुदैवाने अपघातात कुणालाही दुखापत झालेली नसून सगळे सुखरुप आहेत.