सोलापूर विकास मंचने केले जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे सावध
येस न्युज मराठी नेटवर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ०९ ऑगस्ट २०२२ रोजी सोलापूरातील विविध योजनांच्या उद्घाटनासाठी स्वतः व्यक्तीगत उपस्थित राहणार आहेत. सोलापूर विकास मंच गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य जनतेला अत्यंत धोकादायक अश्या श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी विषयी शेकडो निवेदनाद्वारे केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाला अवगत केले, तरी प्रशासनाच्या वतीने ह्या विषयावर कोणत्याही गांभीर्याने विचार न करता होटगीरोड विमानतळावरून व्हि.व्हि.आय.पी आणि लहान खासगी विमाने धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेले सोलापूरचे होटगी रोड विमानतळ हे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय तथा डि.जी.सी.ए.च्या वतीने अनकंट्रोल आणि अनलाईसन्स घोषित करण्यात आले आहे. अनकंट्रोल आणि अनलाईसन्स यांचा अर्थ म्हणजे होटगी रोड विमानतळावरून कोणत्याही विमानाचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी नागरी उड्डयन मंत्रालय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची नसून ती राज्य सरकारची असणार असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री हे हवाई मार्गाने होटगी रोड विमानतळावर त्यांच्या स्वतंत्र खासगी विमानांनी उतरणार आहेत.
श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी ह्या अनकंट्रोल आणि अनलाईसन्स विमानतळामुळे ह्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींचे जीव नक्कीच घेणार असल्याचे खात्रिलायक माहिती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे अधोरेखित केली. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या यादीत नाव समाविष्ट असलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीमुळे प्राण गमवावे लागल्यास संपूर्ण जगात सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या अनागोंद कारभाराची नाचक्की होईल, श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी तात्काळ पाडावी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित सर्व भारतीयांचे प्राण वाचवावे अश्या आशयाचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिले. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अॅड.प्रमोद शहा, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रतिक खंडागळे, विजय कुंदन जाधव आदी उपस्थित होते.