मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि सोबतच बक्षिसांचा वर्षाव होत आहे. सध्या संपूर्ण देशाला नीरज चोप्रा मायदेशी कधी परतणार याची आस लागली आहे. नीरज चोप्राच्या हरियाणातील गावातही सध्या उत्साहाचं वातावरण असून दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हरियाणातील खांदरा हे नीरज चोप्राचं मूळ गाव आहे. उद्धव ठाकरेंनी पीएमार्फत नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. मुंबईत त्याचे भव्य स्वागत होणार आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो” असही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे सांगितले .१३ ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. यावेळी इतिहासात आजवर झाले नाही असे सेलिब्रेशन करणार असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलआहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितल. नीरज चोप्राच्या विजयानंतर संभाजीनगरमध्ये फटाके वाजवण्यात आले सांगत त्यांनी अभिमान व्यक्त केला.सुवर्णयशाचा ‘भालेदार’ २३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला. भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला. १३ वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली.