येस न्युज मराठी नेटवर्क । तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला.
रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं.
“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.