मुंबई: आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. ते बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध थेट ‘आर या पारची’ भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.