येस न्युज नेटवर्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हे, अशा आशयाचे पत्र उदयनराजे यांनी दिलं आहे.
पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे – उदयनराजे
राज्यपालांच्या वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत भाजप जबाबदार नाही. या संदर्भात 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपतींनी आधीच दखल घेतली आहे. आजही प्रक्रियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे, तसेच मोदींकडे आमची भूमिका पोहचली आहे, तसेच पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. असं उदयनराजे म्हणाले.
राज्यपालांविरोधातल्या मविआच्या मोर्चासाठी समर्थनाबाबतही त्यांनी इशारा दिला. मात्र स्पष्ट बोलून दाखवले नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मोर्चात उदयनराजे सहभागी होणार का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दरम्यान आज झालेल्या बैठकीत सर्व खासदारांचं एकमत झालं आहे. असंही उदयनराजे म्हणाले आहेत.