येस न्युज मराठी नेटवर्क । संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे. UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. करोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
“यूएईने पाकिस्तानसह अन्य ११ देशातील नागरिकांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत नव्याने व्हिसा जारी करणे बंद केल्याचे आम्हाला समजले आहे” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाहीद हाफीझ चौधरी यांनी सांगितले. यूएई सरकारने पाकिस्तान शिवाय टर्की, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना व्हिसा जारी करणेही स्थगित केले आहे.
मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.