सोलापूर : पोलिसांना पाहून हातभट्टी घेऊन जाणारी म ोटारसायकल चालकाने एका बोळात घातली. मात्र पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात सापडले. दोघांना अटक करण्यात आली असून, हातभट्टीदारूसह ४३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लेप्रसी कॉलनी, कुमठा नाका, सोलापूर येथे एका मोटारसायकल वरून दोन इसम हातभट्टी दारू ने भरलेले तीन ट्यूब घेऊन जात होते. हा प्रकार सदर बझार पोलिस ठाण्याच्या पथकाला निदर्शनास आला. पोलिसांना पाहून हातभट्टी घेऊन जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने वेगात पळून जाण्यास सुरूवात केली. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने मोटारसायकल एका बोळात घातली. मात्र त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते जागेवरच थांबले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चांगलेच सापडले.
मोटारसायकलवरील दोघांना त्यांची नावे विचारले असता एकाने मिथुन शंकर राठोड (वय ३६ ) भिलसिंग तोळाराम पवार (वय ३४ दोघे रा. मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील तीन ट्युबमधून २३० लिटर हातभट्टी दारू व मोटरसायकल असा एकूण ४३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरूद्ध महाराष्ट्रात दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे सदर बझार पोलिस ठाणे येथे पोलिस कॉन्स्टेबल पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. तपास हवालदार संतोष पापडे हे करीत आहेत. ही कारवाई हवालदार संतोष पापडे, तिमिर गायकवाड, संतोष लवटे, पुजारी यांनी पार पाडली.