सोलापूर, दि. 28 : कोरोना रुग्णाच्या तपासणीसाठी वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयात नवीन प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेसाठी दोन कोटी 39 लाख रुपयांच्या तरतुदीस आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
सोलापूरातील कोरोना विषाणूच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी क्षमता वाढविण्यासाठी नवीन प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव महाविद्यालयाने सादर केला आहे. या प्रस्तावाची आणि प्रयोगशाळा उभारणीबाबत आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर, कार्यकर्ते यांच्याकडून तपासणी करुन घ्यावी. कोणत्या प्रकारची मशीनरी घ्यावी, प्रयोग शाळेची रचना काय असावी याबाबत तज्ञ डॉक्टर कार्यकर्ते यांची मते घ्यावीत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
यापुढे संशयित कोरोना बाधितांचे स्वॅब तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत न देण्याचाही निर्णय घेण्यात आला. सध्या वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालीयातील प्रयोगशाळेत दिवसाला सहाशे ते आठशे स्वॅबची तपासणी केली जाते. नवीन प्रयोगशाळेमुळे दररोज आणखी 1200 स्वॅबची तपासणी केली जाऊ शकते, असे सहायक अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल यांनी सांगितले.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, लेखाधिकारी राजेंद्र नागणे आदी उपस्थित होते.