सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांना एकत्र करण्यात आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना आमदार देशमुख यांनी एकत्र आणले आहेत असे असतानाच आता बाजार समितीच्या निवडणुकीत दोन उमेदवारांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक विभागातून उमेदवार असलेले युवराज कापसे आणि ग्रामपंचायत सर्वसाधारणमधील अपक्ष उमेदवार आरिफ अबूमिया कुरेशी यांनी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेत सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही उमेदवारांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब शेळके, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, जेष्ठ नेते डॉ. चनगोंडा हवीनाळे, पप्पू जमादार, हणमंत कुलकर्णी, धनेश अचलारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.