डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम
सोलापूर
कुंभारी येथील रे नगरच्या परिसरात रविवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तब्बल अडीच हजार श्री सदस्यांनी सदगुरु प्रेरणेने पंधराशे झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी वड, पिंपळ, कडूलिंब, करंजा, चिंच आदी देशी झांडाचे वृक्षारोपण करुन रोपांना व्यवस्थित बंदिस्त कुंपण घालण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प -तिष्ठानच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन सोलापूरातील श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी केले होते. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सकाळी आठ वाजताच श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी वृक्षारोपणास सुरुवात केली. रे नगरमधील एकूण ९ मार्गावर व कुंभारी ते दोडी महामार्गाच्या एका बाजूने यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केल्यानंतर रोपांचे व्यवस्थित संवर्धन व्हावे यासाठी बांबूच्या साह्याने यावेळी रोपाला सुरक्षित रोपण घालण्यात आले. यासाठी सुमारे दोन हजार बांबू, २५ कापड बंडल वापरण्यात आला. रोपांना पाणी घालण्यासाठी यावेळी तीन टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.
या उपकूमात बाळे, बोरामणी, मुळेगाव, सलगर वस्ती, होटगी स्टेशन, सावंतवाडी, शिंगोली, आकाशवाणी केंद्र सोलापूर, देगाव, रातंजन, मोहोळ, कौठाळी, यावली, पाकणी, बिटले, अर्जूनसोंड, मसले चौधरी, अभिमानश्री, नरोटेवाडी, तळे हिप्परगा, कुचन नगर, मंद्रुप, दोंदे नगर, सोलापूर, म्हाडा कॉलनी, सोलापूर, वडाळा, घरकुल येथील श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेत वृक्षारोपण केले.
यावेळी श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी कोणताही बडेजाव न आणता, अत्यंत शिस्त व शांततेत वृक्षारोपण केल्याने या उपक्रमाचे कौतुक रे नगरमधील रहिवाशियांनी व कुंभारी गावातील ग्रामस्थांनी केले.
या कार्यक्रमास रे नगरचे संस्थापक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम हेही उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या कार्याची महती सांगताना सदर प्रतिष्ठान हे मानवता धर्माच्या मूल्यासाठी वाहून घेतलेले प्रतिष्ठान असून त्यांच्या हातून जगभरामध्ये मानवतेची सेवा घडत आहे व मनुष्याच्या आरोग्याच्या संगोपन होण्यासाठी पर्यावरण संतुलनाचा फार मोठा सहभाग प्रतिष्ठान मार्फत होत असल्यास बद्दल गौरवोद्गार काढले.