नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून शनिवारी कारवाई करण्यात आली. ट्विटरने राहुल गांधी यांचे खाते तात्पुरते लॉक केले होते . दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती.
“राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली. तोपर्यंत राहुल गांधी इतर माध्यमातून तुमच्या संपर्कात राहतील आणि लोकांसाठी आपला आवाज उठवत राहतील असही काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधत ट्विटरला भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला आहे.“भाजपाने केलेल्या तक्रारीच्या आधारे राहुल गांधींचं ट्विटर खातं लॉक करण्यात आले आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे. त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असत,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.