येस न्युज मराठी नेटवर्क । धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातच आता एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. एवढंच नाही तर हेगडे हे धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंबोली पोलिस ठाण्याकडं निघाले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
कृष्णा हेगडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, 2010 पासून रेणू शर्मा ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता 6 जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे. धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, असं हेगडे म्हणाले.