सोलापूर : अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावर एका मालमोटारीची दोन मोटारींना धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारीमधील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. तर अन्य चारजण जखमी झाले. हे सर्व भाविक अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन दुपारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे निघाले होते. चारूशीला अमोल रासकर (वय ३६, रा. मांजरी, पुणे) असे मृत भाविक महिलेचे नाव आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे पती अमोल विजय रासकर (वय ३६) व मुलगा प्रथमेश (वय १०) यांच्यासह चंद्रमा अभिजित रासकर (वय ३४, रा. हांडेवाडी, पुणे) आणि छाया विठ्ठल गुलदगड (वय ६५, रा. बारामती, जि. पुणे) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
यातील मृत आणि जखमी भाविक कुटुंबीय टाटा नेक्सान मॉडेलच्या (एमएच ४२ बीई ८६८१) मोटारीसह किया सोनेट मॉडेलच्या मोटारीने प्रवास करीत होते. अक्कलकोटच्या पुढे चपळगाव येथे समोरून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच १३ सीयू ५१२८) दोन्ही मोटारींना ठोकरले. मालमोटारचालक ऋषिकेश दत्तात्रय पुरी (रा. आरळी, ता. तुळजापूर) यास अक्कलकोट उत्तर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त मोटारचालक अमोल विठ्ठल गुलदगड (वय २९, रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून मालमोटारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.